Rohit Pawar On Pune Guardian Minister: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार महत्वाचा मानला जातो. पण या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे.

महायुतीत मंत्रि‍पदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात असतानाच आता राज्यातील सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचं वाटप कसं असणार? कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या पक्षाच्या नेत्यांना मिळणार? यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणाला मिळणार? अजित पवार की चंद्रकांत पाटील यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे. पुण्याचं पालकमंत्रिपद शंभर टक्के अजित पवारांना मिळेल, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.

हेही वाचा : “…तर माझ्या बरोबर कुणीही काम केलं नसतं”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

रोहित पवार काय म्हणाले?

“मला वाटतं की पुण्याचं पालकमंत्रिपद शंभर टक्के अजित पवारांना मिळेल. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील हे पुण्याच्या पालकमंत्रिपदाच्या रेसमध्ये नसतील असं मला वाटतं”, असं मोठं विधान रोहित पवार यांनी केलं. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

पुण्याचं पालकमंत्री पद कोणाकडे जाईल? तुमच्याकडे (चंद्रकांत पाटील) की अजित पवारांकडे? असा प्रश्न भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना शुक्रवारी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला होता. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “तुम्ही अशा माणसांना प्रश्न विचारता की ज्याला प्रश्नही तोच आणि उत्तरही तेच. माझे वरिष्ठ जे सांगतील ते मी करतो”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया देत थेट उत्तर देणं टाळलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच?

राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता महायुतीच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता जेव्हा पालकमंत्रिपद ठरवलं जाईल तेव्हा नेमकं कोणाला हे पद मिळतं? ते स्पष्ट होईल.