पुणे : काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये सहा जणांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र ही कार्यकारिणी जाहीर करताना काँग्रेस नेत्यांना टिळक कुटुंबीयांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रदेश प्रतिनिधी नसलेल्यांनाही या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले असून जुन्या चेह-यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये यापूर्वी सरचिटणीस असलेल्यांना वगळण्यात आले असून काही जणांच्या पदाची अदलाबदली करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कार्यकारिणीत अजित आपटे आणि वीरेंद्र किराड यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. त्यांना वगळण्यात आले आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष पदी माजी आमदार मोहन जोशी आणि माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. माजी आमदार अनंत गाडगीळ यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली असून गोपाळ तिवारी यांच्याकडेही राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. संजय बालगुडे यांना सरचिटणीस करण्यात आले आहे. या पूर्वी च्या कार्यकारिणीत प्रदेश सरचिटणीस असलेले रोहित टिळक यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसलाच टिळक कुटुंबियांचा विसर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सदानंद शेट्टी यांनाही सरचिटणीस करण्यात आले आहे. मात्र शेट्टी सातत्याने पक्ष बदलत असतात त्यामुळे त्यांना मिळालेल्या संधीबाबतही काही निष्ठावंतांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणीमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रांत प्रतिनिधी असणे आवश्यक असते मात्र प्रतिनिधी नसतानाही शेट्टी आणि बळीराम डोळे तसेच सुनील मलके यांना स्थान देण्यात आल्यामुळे काँग्रेस वर्तुळात चर्चा रंगली आहे. अल्पसंख्याक समाजाला संधी देताना कार्यकारिणीत माजी नगरसेवकांऐवजी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांच्याकडे सरचिटणीसपद देण्यात आले आहे. मात्र कार्यकारिणात पुन्हा त्याच चेह-यांना संधी देण्यात आल्याने काही पदाधिका-यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.