पुणे : नवीन शैक्षणिक वर्षानुसार शाळांना लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या वाहनांची योग्यता तपासणी करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याबाबत सोमवारी आदेश काढले असून, सुट्टीच्या दिवशीदेखील तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रशासनाने तसेच खासगी वाहनधारकांकडून सेवा दिली जाते. विद्यार्थ्यांची सुरक्षित व्हावी म्हणून शालेय बस, व्हॅन या वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र अद्ययावत असणे बंधनकारक आहे. त्यासाठी सर्व सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक आस्थापनातील वाहनांची तातडीने तपासणी करावी. त्यासाठी ‘आरटीओ’कडून संबंधित वाहनधारकांना दिवे येथील कार्यालयात कागदपत्र सादर करून योग्यता प्रमाणपत्र अद्ययावत करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले, तर शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी दिवे (ता. पुरंदर) येथील कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.