पुणे : राज्य सरकारने प्रमुख शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सेवेला चार महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली असून, मुंबईमध्ये या सेवेला सुरुवात करण्यासाठी कंपन्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

मात्र, पुणे शहरात ही सेवा सुरू करण्यासाठी आलेल्या दोन कंपन्यांचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नामंजूर केले आहेत. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने हे प्रस्ताव नाकारण्यात आले असल्याने पुणेकरांना ई-बाईक टॅक्सी सेवेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महाराष्ट्र बाइक टॅक्सी योजना २०२१ अंतर्गत ई-बाइक टॅक्सीला परवाना आणि किफायतशीर परिवहन साधन म्हणून प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. यामध्ये किमान भाडे १५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. मुंबईत तात्पुरते परवाने देण्यात आले आहेत. पुण्यात ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी दोन कंपन्यांनी अर्ज केले होते. मात्र, त्यांचे प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते नाकारण्यात आले आहेत.

संबंधित कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले.

ई-बाइक टॅक्सी सेवेतील तरतुदीनुसार, चालकाचे वय किमान २१ वर्षे असावे. त्यांच्याकडे वैध वाहनचालक परवाना असावा. वाहन हे नोंदणीकृत आणि वाहनाचा विमा काढलेला असावा. याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता करून नव्याने प्रस्ताव सादर केल्यास त्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत पुणेकरांना ई-बाइक टॅक्सी सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, पुण्यातील रिक्षा संघटना या ई-बाइक टॅक्सी सेवेला विरोध करत आहेत. या सेवेमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होईल, असा संघटनांचा दावा आहे.

‘नोकरदारांसाठी ई-बाइक टॅक्सी सेवेमुळे दिलासा ठरेल. वेळेची बचत होईल. तसेच खर्च कमी येईल. मेट्रो किंवा बसस्थानकापर्यंत लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. – राहुल पांडे, प्रवासी.

‘पुण्यात ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी दोन कंपन्यांनी अर्ज केले होते. मात्र, त्यांचे प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते नाकारण्यात आले. संबंधित कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार आहे. – स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवनहन अधिकारी, पुणे.