पुणे : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार भारत (बीएच) मालिकातील क्रमांक असलेल्या वाहनधारकांना दोन वर्षांनंतर वाहन कर भरणे बंधनकारक आहे. मात्र, मुदत संपुष्टात आल्यानंतरही या मालिका क्रमांकातील सर्वाधिक वाहनधारक हा कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कठोर पावले उचलून मुदतीनंतर १०० रुपये दंड आणि जादा विलंब केल्यास अतिरिक्त दंड आकारण्याचा इशारा दिला.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०२१ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेमुळे देशभरात ‘बीएच’ मालिकेतील वाहनांची नोंदणी सुलभ झाली आहे. या योजनेअंतर्गत वाहन मालकांना एकाच नोंदणीद्वारे देशभरात वाहन चालवण्याची मुभा मिळते. अधिसूचनेनुसार, वाहनाचा कर दोन वर्षांसाठी एकदाच आकारला जातो. कराची मुदत संपल्यानंतरच्या सात दिवसांनंतर, म्हणजे आठव्या दिवसापासून प्रतिदिन १०० रुपये दंड लागू होतो.
पुणे आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘बीएच’ मालिकेतील वाहनांची दोन वर्षांची कर मुदत संपल्यानंतरही अनेक मालक कर भरण्यात टाळाटाळ करत आहेत. यामुळे दंडाच्या रकमेतही मोठी वाढ झाली आहे. ‘बीएच’ मालिकेतील वाहनमालकांनी कराची मुदत संपण्यापूर्वीच किंवा वेळेत कर भरावा, अन्यथा मुदत संपल्यानंदर प्रतिदिवस १०० रुपये आणि दिवसांच्या विलंबानुसार अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे.’
ऑनलाईन सुविधा उपलब्ध
वाहनमालकांसाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, नजीकच्या आरटीओ विभागातही संपर्क साधून कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
‘बीएच’ मालिकेतील वाहनांची संख्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आहे. कोणत्याही ठिकाणी हा कर भरता येत असला, तरी या वाहनांचा कर भरला आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधितांनी वाहनाचा कर वेळेत भरणे अपेक्षित असून, तातडीने मुदतीच्या आत कर भरावा, अन्यथा नियमानुसार कारवाई करून विलंब झाल्यास जादा दंड आकारण्यात येणार आहे. – स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे