कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा व्यक्त करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांची पक्षाकडून कान उघाडणी करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात घाई गडबडीत चर्चा करणे हा पुण्याच्या राजकीय संस्कृतीचा अपमान आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाटील यांच्या मागणीसंदर्भात नाराजी व्यक्त केली. पुण्याची राजकीय संस्कृती राज्यातही आदर्श आहे. त्यामुळे निवडणुकीसंदर्भात कोणीही काही भाष्य करू नये, अशी सक्त सूचनाही पदाधिकाऱ्यांना दिली आहे, असेही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- पुणे: शहरातील फलकबाजीविरोधात ‘पीपीसीआर’तर्फे ‘नो फ्लेक्स’ मोहीम

भारतीय जनता पक्षाच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाच्या आजाराशी झुंज देताना निधन झाले. त्यामुळे कसबा विधानसभेची जागा रिक्त झाली असून ही जागा बिनविरोध करण्यासंदर्भातील हालचाली भारतीय जनता पक्षाकडून सुरू झाल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पोटनिवडणूक झाल्यास निवडणूक लढविण्याची इच्छा प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती. पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविली जाईल, असे रुपाली पाटील यांनी सांगितले होते. पाटील यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चित्रफित प्रसारीत करून पाटील यांची कानउघाडणी केली.

हेही वाचा– पुणे : बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांना संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुक्ता टिळक यांच्या निधनाने शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची हानी झाली आहे. त्यांचे निधन होऊन पाच दिवसही होत नाही तोच निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. पुण्याची ही राजकीय संस्कृती नाही. भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या परिस्थितीमध्ये निवडणुकीसंदर्भात कोणी चर्चा करणे योग्य नाही. पुण्याच्या राजकीय संस्कृतीला ते अनुकूल नाही. त्यामुळे निवडणुकीसंदर्भात घाई गडबडीने कोणी कोणत्याही प्रकारचे भाष्य करू नये, अशी सक्त सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.