पुणे : कारागृहातून संचित रजा (पॅरोल) मिळवून बाहेर आलेल्या कैद्याला पिस्तूल विक्री करताना गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. प्रदीप उर्फ शप्पू जनार्दन कोकाटे (वय ३४, रा. वाघ मळा, विठ्ठलवाडी, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
कोकाटेने २०१४ अहमदनगर परिसरात एकाचा खून केला होत. याप्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नगर जिल्ह्यातील विसापूर खुल्या कारागृहात तो शिक्षा भोगत होता. कारागृह प्रशासनाकडून त्याने संचित रजा मिळवली होती. संचित रजा मिळवून तो बाहेर पडला. रजा संपल्यानंतर तो कारागृहात परतला नाही. कोकाटे कोंढव्यातील खडी मशीन चौकात पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस हवालदार खरपुडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कारागृह प्रशासनाला देण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाधमारे, सहायक निरीक्षक पाडवी, खरपुडे, रामाणे, लोखंडे, सपकाळ, इंगळे यांनी ही कारवाई केली.