छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजेंनी मराठी निर्माते, दिग्दर्शकांना जाहीर इशाराही दिला.

“छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास केला आहे. असे चित्रपट लोकांसमोर नेले जात आहेत. महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावे आपण काहीही दाखवत आहोत. इतिहासाचा गाभा सोडता कामा नये,” असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावर संभाजीराजे संतापले, इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप

“इतिहासावर आधारित चित्रपट काढले जातात ही चांगली गोष्ट आहे. पण लोकांना आवडतात म्हणून विपर्यास करुन असले चित्रपट काढत आहात,” असा संताप संभाजीराजेंनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातील मावळ्यांच्या पोषाखावरही भाष्य केलं. चित्रपटाचं पोस्टर दाखवत ‘हे मावळे वाटतात का?’ अशी विचारणा त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छितो की, जर असेच चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. चित्रपट काढून तर दाखवा, मी आडवा नाही आलो तर बघा. मीच आडवा येणार, अन्यथा या घराण्यात जन्म होऊन काय फायदा आहे. वेळप्रसंगी मला काही झालं तरी चालेल, पण महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा,” असा जाहीर इशारा यावेळी त्यांनी दिला. जरा भालजी पेंढारकर यांचा आदर्श घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.