पुणे : काँग्रेस पक्षाचे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना पक्ष नेतृत्वाकडून वेळोवेळी डावलण्यात आल्याने, अखेर संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पदाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची माहीती समोर येत आहे. येत्या काही दिवसात संग्राम थोपटे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तर या सर्व घडामोडी दरम्यान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पुणे दौर्‍यावर होते.

त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडी बाबत भाष्य देखील केले. संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अनंतराव थोपटे हे महाराष्ट्राचे स्वाभिमानी नेतृत्व असून ते आमचे नेते आहेत. अनंतराव थोपटे यांच्या परिवारामध्ये संघर्षाचा वारसा आहे आणि तोच वारसा संग्राम थोपटे यांनी जोपासला पाहिजे, अशी मला अपेक्षा आहे. मागील काळात विधानसभा अध्यक्ष पदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव अंतिम झाले होते, मात्र त्या पदापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जाऊ दिले नाही. तसेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर दबाव आणून निवडणुक जाहीर करून दिली नाही.

त्यामुळे संग्राम थोपटे हे विधानसभा अध्यक्ष होऊ शकले. तर विधानसभा अध्यक्ष पद रिक्त असल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याच काम झालं. तसेच त्या काळात संग्राम थोपटे हे विधानसभा अध्यक्ष झाले असते, तर हे सर्व टाळल गेलं असतं, पण हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झालं आहे आणि हा अन्याय देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच आणि संग्राम थोपटे यांचे नुकसान केले आहे.त्यामुळे संग्राम थोपटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोणत्याही जाशामध्ये येऊ नये, त्याचबरोबर संग्राम थोपटे यांनी आत्मघातकी आणि चुकीचा संदेश जाईल, असा निर्णय घेऊ नये. तसेच त्यांनी पक्ष सोडून भाजपात जाण्याचा निर्णयाच घेऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.