पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्याचे पाहण्यास मिळत आहे.दरम्यान शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट हे पुणे दौर्यावर होते. उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. यावरून पुन्हा वेगळया चर्चांना उधाण आले आहे.
या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले, मनसे आणि उबाठा एकत्र येत असल्यास आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊ नये, अशी आमची कोणाचीही भावना नाही. राजकीय बाजू सोडून आम्ही काही नाती जपतो, राज ठाकरे यांच्या घरी मी गेलो होतो. मला जर उद्या उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी जाऊ शकतो. राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे. तसेच राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेत आहेत. त्यामुळे तुम्ही याचा अर्थ असा काढू नका की, उध्दव ठाकरे यांच्यासोबत बोलण झाल म्हणजे संजय शिरसाट पळाला, तसेच शरद पवार आणि अजित पवार हे भेटत नाहीत का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे भविष्यात आणखी चांगला नेता व्हावेत
आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोरांन चांगल राहावं, चांगल वागाव, चांगल बोलाव आणि लवकर लग्न कराव, वडिलांना त्रास होता कामा नये, याबाबत काळजी घ्यावी आणि ते भविष्यात आणखी चांगला नेता व्हावेत,अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.
अजितदादांनी मला निधी दिला
सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही. याबाबत या विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी उघडउघड नाराजी व्यक्त करीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. यावरून जवळपास राजकीय वर्तुळात महिनाभरापासून चर्चा रंगली होती. त्यावरून महायुती मध्ये निधी वाटपावरून धुसफुस असल्याचे दिसून आले. त्याच दरम्यान मंत्री संजय शिरसाट हे पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी निधी वाटपाबाबत भूमिका मांडताना ते म्हणाले, मागील मंगळवारी अजित पवार यांची भेट घेतली. आमच्या दोघांमध्ये चांगली चर्चा झाली असून मला दादांनी तातडीने निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.