पुणे : ‘बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बेछूट आरोप करत आहेत. त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करून अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ अशी टीका सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी केली. ‘देशमुख यांच्या हत्येसंदर्भात काही पुरावे असतील, तर ते पोलिसांना द्यावेत,’ असे आवाहनही शिरसाट यांनी दमानिया यांना केले.

सामाजिक न्याय विभागाच्या पुण्यातील वसतिगृहांच्या पाहणी दौऱ्यानंतर शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येतील तीन मारेकऱ्यांचा खून करून त्यांना कर्नाटकात फेकून देण्यात आले आहे. त्यामुळे आता हत्येतील मारेकरी कधीच सापडणार नाहीत,’ असा आरोप दमानिया यांनी केला होता. हा आरोप खोडून शिरसाट यांनी खोडून काढला.

हेही वाचा…कोरेगाव भीमा सोहळ्याच्या सुविधांचे कायमस्वरुपी नियोजन… कोणी दिले आदेश ?

शिरसाट म्हणाले, ‘दमानिया यांनी देशमुख यांच्या हत्येसंदर्भात खोटे आरोप करून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशमुख यांच्या मारेकऱ्यांची खरोखरच हत्या झाली असेल, तर ते मृतदेह कोठे आहेत, हे त्यांनी सांगावे. ठोस माहिती, पुरावे असतील, तर पोलीस अधीक्षकांकडे द्यावेत. निरर्थक आरोप करू नयेत. अशा आरोपांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून, राजकारणाला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

हेही वाचा…पीएमपीची दोन दिवस मोफत बस सेवा… असे असणार मार्ग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सक्षमपणे काम करत आहे. मुख्य आरोपीपर्यंत पोचण्यासाठी सहा विविध तपास यंत्रणा काम करत आहेत. या हत्येत कोणत्याही राजकीय पक्षाचा मंत्री, नेता किंवा त्यांचा निकटवर्तीय असला, तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. एखादा आरोपी राजकीय पक्षाचा निकटवर्तीय असल्यास आरोपीला शासन होत नाही, आरोपी निर्दोष सुटतो, हा गैरसमज दूर करण्यात येईल,’ असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.