पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (१९ जून) श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. पुणे पोलिसांकडून पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यातील वारकरी, तसेच भाविकांची गर्दी विचारात येऊन यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. गर्दीवर लक्ष ठेवणे आणि नियोजनासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज आाणि श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन शुक्रवारी (२० जून) शहरात होणार आहे. शनिवारी (२१ जून) पालखी सोहळा शहरात मुक्कामी असणार आहे. रविवारी पहाटे पालखी सोहळा शहरातून मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळ्यातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भाविकांची सुरक्षा, तसेच पालखी सोहळ्यात भाविकांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटना विचारात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. विश्रांतवाडी चौक, संचेती चौक, डेक्कन जिमखाना भागातील नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, गोखले स्मारक चौक (गुडलक चौक), हडपसर गाडीतळ, दिवे घाट येथे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

दिवे घाटातील वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा दिंडीतील वाहने आणि वारकरी एकाच वेळी घाटात प्रवेश करणार नाहीत. पहिल्यांदा वारकऱ्यांना मार्गस्थ करण्यात येणार आहे. त्यानंतर दिंडीतील वाहने घाटातून सोडण्यात येणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.

दिवे घाटात डोंगरावर थांबण्यास बंदी

दिवे घाटातील रस्त्याचे रुंदीकरण सुरू करण्यात आले आहे. रुंदीकरणासाठी डोंगर फोडण्यात आला आहे. या कामासाठी ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा (सुरुंगाचा) वापर करण्यात आला आहे. त्यामुळे डोंगरावरील माती आणि दगड सैल झाले आहेत. दरड कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. दर वर्षी हजारो भाविक दिवे घाटातील डोंगरावर जाऊन पालखी सोहळा पाहतात. पोलिसांनी घाटात भाविकांना सूचना देणारे फलक लावले आहेत. घाटातील डोंगरावर भाविकांनी शक्यतो थांबू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी सोहळ्यात कडक बंदोबस्त

पालखी सोहळ्यात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलिसांची पथके, गुन्हे शाखेची पथके तैनात असतील.