पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन रविवारी सकाळी मार्गक्रमण केले. टाळ-मृदंगाच्या निनादामध्ये मुखी हरिनामाचा गजर करीत हडपसर येथून सोलापूर रस्त्याने सरळ मार्गक्रमण करणाऱ्या पालखीने लोणी काळभोर येथे मुक्काम केला. एकादशी असल्याने भाविकांनी रविवारी वारकऱ्यांना फराळाच्या पदार्थांचे वाटप केले.
पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर रविवारी पहाटे पालखी सोहळ्याने मार्गक्रमण केले. हडपसर गाडीतळ येथे संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी बाराच्या सुमारास आली. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. हडपसर भागातील सामाजिक संस्था, गणेश मंडळे, राजकीय पक्षांकडून वारकऱ्यांना फराळाचे पदार्थ, पाणी वाटप करण्यात आले. वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून दमलेल्या वारकऱ्यांना मसाज सेवा देण्यात आली.
हडपसरपर्यंत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालखीचा एकत्रित प्रवास झाला. मात्र, तेथून दोन्ही पालख्यांनी दोन मार्गांनी मार्गक्रमण केले. दोन्ही पालख्यांच्या विसाव्यादरम्यान मगरपट्टा, हडपसर गाव आणि गाडीतळ परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने लोणी काळभोर येथे मुक्काम केला.