पुणे : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्ष  (७५ वे) शुक्रवारपासून सुरू होत आहे. विविध कार्यक्रम वर्षभर अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे.

विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या या विद्यापीठाची ओळख ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी आहे. तत्कालीन पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली होती. त्या घटनेला १० फेब्रुवारी रोजी ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. बॅरिस्टर मुकुंद जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. २०१४मध्ये पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. गेल्या ७४ वर्षांत विद्यापीठाने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाममुद्रा उमटवली आहे.

हेही वाचा >>> लोणावळा : टोल नाक्यावरील टोल यंत्रणेत बिघाडामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर प्रचंड कोंडी

विद्यापीठाचा वर्धापन दिन आणि अमृत महोत्सवी वर्ष प्रारंभ कार्यक्रम शुक्रवार (१० फेब्रुवारी) विद्यापीठाच्या हिरवळीवर संध्याकाळी चार वाजता घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य भिकूजी इदाते हे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. कारभारी काळे असणार आहेत. या वेळी प्र.कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृत महोत्सवी वर्षात विविध विषयांवर शैक्षणिक परिषदा, माजी कर्मचाऱ्यांचे संमेलन आदी कार्यक्रम होतील. खास अमृत महोत्सवी वर्षासाठी आर्थिक अंदाजपत्रकात विशेष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. अमृत महोत्सव वर्षासाठी विशेष समिती स्थापन करून अन्य कार्यक्रमांची आखणी पुढील काही दिवसांत केली  जाईल. या वर्षात नगर नाशिक केंद्रांच्या विकासाचा विचार केला जाईल. ७५ वर्षानंतरचा विचार करता देशाला आयात कराव्या लागणाऱ्या वस्तुंचे संशोधन विकास करण्यासारखे प्रकल्प हाती घेतले जातील. त्याशिवाय मराठी भाषा भवनाचे काम अमृत महोत्सवी वर्षात पूर्ण करण्यात येईल. – डॉ. संजीव सोनवणे, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ