पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र- कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची केलेली नियुक्ती वादात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी डॉ. काळकर यांच्या निवडीबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच सर्व कायदेशीर बाबी तपासूनच डॉ. पराग काळकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र- कुलगुरूपदी निवड करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. काळकर यांच्यावर आर्थिक प्रकरणात गुन्हा दाखल असल्याने विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू पदावरील त्यांच्या निवडीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. तसेच ही निवड तातडीने रद्द करण्याची मागणी केली. तसेच काही संघटनांकडूनही या निवडीवर आक्षेप घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी स्पष्टीकरण दिले.
विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार सर्व नियमांचा अभ्यास करूनच प्र- कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निवड करण्यात आली. कुलगुरू आणि प्र- कुलगुरू यांच्यात एकवाक्यता असावी, हा विद्यापीठ कायद्यातील तिसऱ्या सुधारणेमागचा मूळ उद्देश होता. कायद्यातील तरतुदीनुसार प्र- कुलगुरू निवडीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या संमतीनेच घेण्यात आला. प्र- कुलगुरू पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून योग्य उमेदवार निवडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सर्व कायदेशीर बाबी तपासूनच डॉ. काळकर यांची निवड करण्यात आल्याचे डॉ़ गोसावी यांनी नमूद केले.
हेही वाचा : पुणे: रक्षाबंधनानिमित्त पीएमपीकडून जादा गाड्यांचे नियोजन
प्र- कुलगुरू पदासाठी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर काम केलेली, संलग्नित महाविद्यालयात कामाचा प्रदीर्घ अनुभव, वेगळ्या विद्याशाखा आणि विषयातील व्यक्ती असावी, तसेच कुलगुरू आणि प्र- कुलगुरू पदावरील दोन्ही व्यक्ती विद्यापीठाच्या आवारातील नसावी, हा विचार होता. सामाजिक बांधिलकीचा विचार करूनच निवड करण्यात आली, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात क्रमवारीमध्ये विद्यापीठाचे स्थान उंचावणे, नॅक मूल्यांकनात विद्यापीठाला पुढे जाण्यासाठी प्र- कुलगुरू यांची निवड लवकर करणे गरजेचे होते. या पूर्वी नियुक्त झालेल्या प्र- कुलगुरूंमध्ये बहुतांश जण संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य होते. विद्यापीठाला पुढे घेऊन जाण्यासाठी संलग्न महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्र- कुलगुरू असणे सोयीचे होईल. हा विचार करून काळकर यांच्या नियुक्तीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत करण्यात आल्याचे डॉ. गोसावी यांनी सांगितले.