शिरुर : शिरुर परिसरातील दहिवडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने दहिवडी परिसरात शोककळा पसरली. यश सुरेश गायकवाड (वय ११) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. यश पाचवीत होता. गायकवाड कुटुंबीय दहिवडी गावातील देवमळा परिसरात राहायला आहेत.

हेही वाचा >>> पुणे: हडपसर पोलीस ठाण्याच्या लाॅकअपमधून चोरटा पसार

शनिवारी सकाळी तो नैसर्गिक विधीसाठी घराच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या फडात गेला. बराच वेळ झाला, तरी यश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा यश उसाच्या फडात मृतावस्थेत सापडला. यशवर बिबट्याने हल्ला केल्याचे उघडकीस आल्यानंतर गावात शाेककळा पसरली. या घटनेची माहिती त्वरित वन विभागाला कळविण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून शिरुर तालुक्यातील दहिवडी गाव परिसरात बिबट्याचा वावर आहे. या भागात दाट झाडी, उसाचे फड आहेत. घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा >>> खबरदार, रुग्णांना बाहेरून औषधे आणायला लावली तर… ससूनचे नवे अधिष्ठाता डॉ. पवार यांची डॉक्टरांना तंबी

बिबट्याला पकडण्यासाठी दहिवडी गावात सहा पिंजरे, तसेच ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या भागात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. बिबट्याच्या पावलांचे ठसे घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यशचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालाद्वारे मिळेल, असे जगताप यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू; ग्रामस्थ भयभीत

यशचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शिरुर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या वावरामुळे शिरुर तालुक्यातील ग्रामस्थ भयभीत आहेत. शिरुर तालुक्यात जनजागृती करण्यात येत आहे.