पुणे : सुमारे दीड महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने स्कूल व्हॅन, मुलांना सोडायला आलेल्या पालकांची वाहने अशा कारणांमुळे मध्यवर्ती पेठांमध्ये सोमवारी सकाळच्या सत्रात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यातच पावसाची रिपरिप सुरू असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
राज्य मंडळाशी संलग्न शाळांचे शैक्षणिक वर्ष सोमवारपासून (१६ जून) सुरू झाले. उपनगरांमध्येही आता अनेक शाळा असल्या, तरी मध्यवर्ती पेठांमध्ये असलेल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचाही टक्का मोठा आहे. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत शाळा भरतात. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासूनच पेठांमध्ये विद्यार्थी, पालक, स्कूलव्हॅनची गर्दी सुरू झाली. त्यानंतर कार्यालयीन वेळेत बाहेर पडलेल्या नोकरदारांसह दुपारच्या सत्रातील शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कूलव्हॅन, पालकांची वाहने यामुळे गर्दीत भर पडली. त्यामुळे बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठकेर रस्ता, लक्ष्मी रस्ता परिसरात गर्दी झाली होती. परिणामी, काही पालकांना शाळेपासून दूरवर दुचाकी लावून चालत जाऊन मुलांना शाळेत सोडावे लागले.
पहाटेपासूनच पाऊस सुरू झाला होता. तसेच दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालकांना रेनकोट, छत्री घेऊन बाहेर पडावे लागले. पावसामुळे वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते.