पुणे : ऐन फेब्रुवारी महिन्यात उकाडा वाढू लागला असून आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा लागू लागल्या आहेत. अशावेळी ‘आपण पाणी तयार करू शकलो असतो तर किती बरं झालं असतं’ असा विचार नकळत मनात येवून जातो. पण, आता खरंच पाणी तयार करणं शक्य आहे. बायोगॅस प्रकल्पात थोडेसे आधुनिक तंत्रज्ञान वापरुन दररोज एक हजार ते एक लाख लिटर पाण्याची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान पुण्यातील शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसित केले आहे.

मुखर्जी म्हणाले, की ओल्या कचऱ्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येतात. याच प्रकल्पामधून उर्जेबरोबरच आपल्याला पाणीही मिळू शकते. बायोगॅस हे एक हायड्रोकार्बन आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असतो. आपण जेव्हा बायोगॅस पेटवतो तेव्हा ठरावीक तापमानानंतर यातील हायड्रोजन ऑक्सीजनच्या संपर्कात येवून (H2O) पाणी तयार होते आणि वाफेच्या रूपात वर उडून जाते. अशा वेळी चिमणीच्या तोंडाशी पाणी साठवणूक साहित्य वापरल्यास नागरिकांना पिण्यायोग्य चांगले पाणी मिळू शकते. एक किलो बायोगॅसपासून दोन लिटर पाणी तयार होवू शकते.

हेही वाचा >>>पावणेतीन कोटींची दारू जप्त : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

उत्तर अमेरिकेत ४८ वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तसेच २००३ मध्ये या तंत्रज्ञानाच्या शोधासाठी मला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे. ‘नॅशनल बायोगॅस मॅनेजमेन्ट प्रोग्राम’ या सरकारच्या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात दहा लाख बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत. त्यापैकी काही प्रकल्प सुरू देखील झाले आहेत. मात्र, आगामी प्रकल्प उभारताना जर सरकारने पाणी साठवणूक साहित्य (Water recovery unit) बसवल्यास ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच हे उपक्रम तयार करण्यासाठी उद्योग उभा केल्यास ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देखील उपलब्ध होईल. शिवाय या उपकरणाला देखभाल दुरुस्तीची गरज नाही. हे तंत्रज्ञान मोठे उद्योग समूह, भाजी मंडई आणि मोठ्या बायोगॅस प्रकल्पासाठी फायदेशीर आहे, असेही मुखर्जी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा पाण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात बोअरवेल लावले जातात. यामुळे जमिनीतील पाणी पातळी कमी होते. शिवाय पाणी काढण्यासाठी विजेचा खर्च योतोच आणि कालांतराने पाण्याची गुणवत्ता देखील बिघडते. मात्र, बायोगॅसपासून पाण्याची निर्मिती केल्यास अशी कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग केल्यात देशातील पाण्याचा प्रश्न येत्या तीन वर्षात संपून जाईल, असा विश्वास मुखर्जी यांनी या वेळी व्यक्त केला.