पुणे : अवघ्या दोन दिवसांत केवळ मुंबई-पुणे अशा मोसमी वाऱ्यांच्या अतिवेगवान प्रवासामुळे शास्त्रज्ञांनाही अचंबित केले आहे. पावसाची ही वाटचाल अशक्य नसली तरी अत्यंत दुर्मीळ असल्याचे हवामान संशोधकांचे म्हणणे आहे.

मोसमी वाऱ्यांच्या अभ्यासातून गेल्या काही वर्षांमध्ये ठोकताळे तयार झाले. पाऊस केरळमध्ये १ जूनला दाखल होतो, ८ जुलैपर्यंत देश व्यापतो, १७ सप्टेंबरच्या सुमारास माघारी फिरतो आणि १५ ऑक्टोबरच्या सुमारास निघून जातो, हे वेळापत्रक आपण आखून घेतले आहे. दरवर्षी यात काही दिवसांचा फरक पडतो. यंदा मात्र मोसमी वाऱ्यांची अचंबित करणारी आगेकूच झाली आहे.

केरळमध्ये २४ मे रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी अवघ्या दोन दिवसांत मुंबई-पुण्यात शिरकाव केला. याबाबत भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर म्हणाले, की गेल्या काही वर्षांत पावसाचे निकष बदलले आहेत. पूर्वी उपग्रह नसताना अंदाज वर्तवण्यास मर्यादा होत्या. आता अंदाज वर्तवण्याची क्षमता वाढली आहे. गेली आठ वर्षे पाऊस सर्वसाधारण होता. त्यामुळे यंदा आलेला पाऊस लवकर वाटतो आहे. पाऊस लवकर आला म्हणजे फार काही वेगळे घडले असे नाही.

या पूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत, अशी पुष्टी त्यांनी जोडली. तर ही घटना अतिशय दुर्मीळ असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनीही मान्य केले. काही दिवसांपूर्वी कर्नाटक-गोवा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते क्षेत्र उत्तरेकडे सरकले. सध्या ही प्रणाली मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर सक्रिय आहे. त्यामुळे इतक्या जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. ही प्रणाली समुद्रातून पश्चिमेकडे दूर गेली असती, तर पावसाला विलंब झाला असता, अशी माहिती त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळमध्ये मोसमी वारे दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात येण्यासाठी आठ-दहा दिवस लागतात, हे आपण ठरवले आहे. मात्र, निसर्गाची अनेक रहस्ये अजून उलगडलेली नाहीत. निसर्ग माणसांच्या नियमांनी चालत नाही. म्हणूनच दरवर्षी वेगळी करामत दिसून येते. पाऊस लवकरही येऊ शकतो, हे निसर्गाने दाखवून दिले. अंदाज वर्तवण्यात आव्हाने आहेत आणि ती असलीच पाहिजेत, शास्त्रज्ञ अचंबित झाले पाहिजेत. त्यातूनच नवे काही शिकता येईल.– डॉ. रंजन केळकर, माजी महासंचालक, आयएमडी