पुणे : महापालिकेच्या अखत्यारितील नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. यासंदर्भात कलाकारांनी केलेल्या मागणीला महापालिका प्रशासनाने गुरुवारी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखविण्यात यावा, या विषयावर कलाकार आणि महापालिका सांस्कृतिक विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये कोणत्या नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखवता येऊ शकतात आणि त्यासाठीच्या यंत्रणा उभारणीवर चर्चा करण्यात आली. त्याला महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, अभिनेत्री गार्गी फुले, अभिनेते विजय पटवर्धन, ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, निर्माते कौस्तुभ कुलकर्णी, मच्छिंद्र धुमाळ, निर्माते उपेंद्र कुलकर्णी आणि नाट्यगृहांचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा >>>हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना खेळ मिळत नाहीत. त्यामुळे मराठी चित्रपट निर्मात्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याला पर्याय म्हणून नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवावेत, या मागणीकडे महापालिका सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असून त्याला गुरुवारी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.- बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग (अजित पवार)