पुणे : राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षायादी गेल्या महिन्यात भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित उमेदवारांना तलाठी पदाची नियुक्तिपत्रे वाटप होणार आहेत. 

तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारी रोजी रात्री उशिरा राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. या याद्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केल्या आहेत. उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>पिंपरी: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची निदर्शने

याबाबत प्रभारी अपर जमाबंदी आयुक्त सरिता नरके म्हणाल्या, ‘वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी आदी प्रक्रिया सुरू आहे. कागदपत्रे पडताळणीत उभे आणि समांतर आरक्षण असे दोन भाग केले आहेत. त्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारची कागदपत्रे असतात, ती कागदपत्रे तपासण्यात येत आहेत. परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवाराचा आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे किंवा कसे, हे तपासण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू केली असून १५ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जिल्हा निवड तपासणी समितीकडून करण्यात येत आहे. या प्रक्रियेत एखादा निवड झालेला उमेदवार गळाल्यास तातडीने प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला निवड समिती पाचारण करणार आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ फेब्रुवारीनंतर नियुक्तीपत्र

वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. १५ फेब्रुवारीनंतर नियुक्त्या मिळतील. ज्या जिल्ह्यांत १००-१२५ च्या आसपास उमेदवारांची तपासणी प्रक्रिया करायची आहे, त्या ठिकाणी दहा-बारा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. १५०-२०० च्या आसपास उमेदवार असलेल्या जिल्ह्यात थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही प्रभारी अपर जमाबंदी आयुक्त नरके यांनी सांगितले.