लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे गट-अजित पवार गट या तीन पक्षांविरोधात लढण्याचे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीकडे निवडून येण्याची खात्री असणारे उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीपुढे आव्हान उभे राहिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नगरसेवकसंख्या १२८ आहे. भाजप-अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेही उमेदवार आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तीनही पक्षांकडे उमेदवारांची कमतरता दिसते. काँग्रेसने मागीलवेळी ६७ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी एकाही जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला नव्हता. राज्यातील सत्ता गेल्यापासून शहर काँग्रेसमध्ये मरगळ दिसत असून काँग्रेसला सक्षम उमेदवार शोधावे लागणार आहेत.

आणखी वाचा-कोणी उमेदवार देता का?…पुण्यात महाविकास आघाडी सक्षम उमेदवारांच्या शोधात

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील सर्व पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत आहेत. शहरातील एकाही पदाधिकाऱ्याने अद्यापर्यंत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केलेले नाही. त्यामुळे पवार यांच्या पक्षात सद्यस्थितीत एक जणही सक्रिय दिसत नाही. त्यामुळे पवार यांना शून्यपासून सुरुवात करावी लागेल असे दिसते. त्यांच्याकडून जुन्या लोकांना पुन्हा मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पवार यांच्या राष्ट्रवादीची भिस्त डॉ. कोल्हे यांच्यावरच राहील.

महापालिकेत ठाकरे गटाचे चार नगरसेवक होते. त्यांना उमेदवारांसाठी शोधमोहीम करावी लागणार आहे. ठाकरे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी देखील आहे. महायुतीतील तीन पक्षांकडे इच्छुकांची संख्या जास्त असून सर्वांना उमेदवारी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे महायुतीकडील नाराजांवरच महाविकास आघाडीची भिस्त राहील असे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे.

आणखी वाचा-पुणे जिल्ह्यातील ४७ गावांत पाणीटंचाई; खासगी टँकरचालकांची चलती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीकडे उमेदवारांची कमतरता नाही. निष्ठावंत लोक पक्षासोबत आहेत. महायुतीतील नाराज महाविकास आघाडीकडून लढतील. महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढाई होईल. -मयूर जैयस्वाल, सरचिटणीस, काँग्रेस