पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीनांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्या वेळी ससूनमधील न्यायवैद्यकीय विभागाचे प्रमुख डाॅ. अजय तावरे तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे डाॅ. तावरे याच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार केल्याचे कलम लागू होत नाही, असे बचाव पक्षाचे वकील सुधीर शहा यांनी बुधवारी युक्तिवादात सांगितले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीनांच्या रक्ताचे नमुने बदल, तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखळ करण्यात आला होता. या प्रकरणातील दहा आरोपींविरुद्धआरोप निश्चिती प्रक्रिया सुरू झाली. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी शुक्रवारी खटल्याची माहिती न्यायालयासमोर मांडली. आरोप निश्चितीबाबत डॉ. तावरे यांच्या वतीने ॲड. सुधीर शहा यांनी बाजू मांडली.
डॉ. तावरे याच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचे पुरावे पोलिसांकडे नाहीत. त्यामुळे दाखल गुन्ह्यातील कलमे त्यांना लागू होत नाही, असा ॲड. शहा यांनी युक्तिवादात सांगितले. या प्रकरणातील अन्य आरोपींची बाजू मांडण्यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांकडून काही दिवसांची मुदत मागण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.