लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांनी आता ऑनलाइन विक्री सुरू केली असून अमली पदार्थाची घरपोहोच ऑनलाइन डिलिव्हरी केली जात आहे. पुणे पोलिसांनी ऑनलाइन अमली पदार्थांची विक्री उघडकीस आणली आहे. ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे अमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५१ लाख रुपयांचा एलएसडी या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. रोहन दीपक गवई (वय २४), सुशांत काशिनाथ गायकवाड (वय २६), धीरज दीपक ललवाणी (वय २४), दीपक लक्ष्मण गेहलोत (वय २५) आणि ओमकार रमेश पाटील (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा… पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस कर्मचारी विशाल शिंदे यांना पुणे शहरात ऑनलाइन डिलिव्हरी अँपद्वारे एलएसडी या अमली पदार्थाची खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी करून सुरुवातीला रोहन गवळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल ९० हजार रुपये किमतीचे ३० मिलिग्रॅम एलएसडी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. एकूण पाच आरोपीकडून पोलिसांनी ५१ लाख रुपये किमतीचे एलएसडी या अमली पदार्थाचे १७ ग्रॅम वजनाचे १०३२ तुकडे जप्त केले.

हेही वाचा… बहिणीच्या शोधात त्याने गाठले नेपाळहून पुणे; पोलिसांच्या मदतीने अशी झाली भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक एकचे विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर,विशाल शिंदे, मनोज कुमार साळुंखे, पांडुरंग पवार, राहुल जोशी, रेहाना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.