पुणे : आजकाल बरं वाटत नाही. मनात विचारांची वादळं घोंगावतायत. जुन्या-नव्या आठवणींच्या ‘फ्रेम’ एकामागून एक सरकत चालल्यात. काळीज थरथरतंय… धाप वाढतेय… घाम फुटतोय… एकेक संवेदना निसटत चाललीय… आता बांध फुटेल. एका फटक्यात जगण्याचे सगळे प्रश्न जगण्यासकट संपवून टाकू. नको ही जीवघेणी अधीरता, अस्थिरता आणि रोजची नीरसता… थांब थोडं. बघं स्वत:कडे. रिती करून टाक ही पोकळी. हळव्या अगतिक क्षणांमधून जगण्याचं बळ मिळवण्यासाठी… स्विकार कर. मदत घे. मार्ग आहेत. मात्र, ‘आत्महत्या’ हे उत्तर नाही, असा सूर मनोविकास प्रकाशनाच्या वतीने आयोजित चर्चासत्रात मानसोपचारतज्ज्ञ, अभ्यासकांकडून गुरूवारी व्यक्त करण्यात आला.

‘मनोविकास’च्या वतीने डॉ. संज्योत देशपांडे लिखित ‘आत्महत्या हे उत्तर नाही’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानिमित्त भांडारकर प्राच्यविद्या मंदिराच्या अभय फिरोदिया सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. अनिल गद्रे, अभिनेत्री-लेखिका अमृता सुभाष, नाटककार-अभिनेता संदेश कुलकर्णी, राजेश देशमुख यांनी मानसिक आरोग्यावर भाष्य केले. प्रकाशक आशिष पाटकर, लेखिका डॉ. देशपांडे या वेळी उपस्थित होत्या. तसेच संजय गणोरकर, जयंत जोशी यांच्या मांडणी चित्रांचे प्रदर्शन, तर बी. जी. लिमये यांनी सुलेखन केलेल्या मानसिक आरोग्यावर भाष्य करणाऱ्या कविता सभागृहात लावण्यात आल्या होत्या.

डॉ. लुकतुके म्हणाले, ‘आत्महत्या करता येते, तसाच आत्मविकासही साधता येतो. अनेकांनी मनाच्या तळाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनाची खिन्नता, अवसाद गृहीत धरून सर्वात मूलभूत विचार गौतम बुद्धांनी सांगितला. ‘दुःख है, दुःख मुक्त स्थिती है, दुःख मुक्त स्थिती पाने की संभावना है, दुःख मुक्त स्थिती पाने की विधी है,’ असे बुद्ध म्हणतो. त्यांची आर्यसत्ये ‘प्रयत्न कर, दुःख मुक्त स्थितीतून बाहेर येता येते,’ असा ठाम संदेश देतात.’

‘सध्या काळात अनेक प्रकारचे मानसिक ताणतणाव निर्माण होत आहेत. आत्महत्याही वाढल्या आहेत. सर्वच क्षेत्रात त्या कमी- अधिक प्रमाणात होत आहेत. मात्र, स्वत:च्या पलीकडे जी माणसे जातात, त्यांच्या मनाला आत्महत्येचा विचार शिवतीही नाही. तरूणांनी सेल्फीच्या जगातून बाहेर येत स्वत:पलिकडचा विचार करायला हवा.’ असे डॉ. गद्रे यांनी सांगितले.  

अमृता सुभाष म्हणाल्या, ‘मानसिक उपचारांची, समुपदेशाची सुरुवात करण्याचा निर्णय अवघड असतो. मन स्वत:ला आजारी मानायला तयार नसते. विचारांचे हजारो भोवरे सतत घोंगावत असतात. सिग्रेट, दारूसारखी व्यसने जशी रोज सोडावी लागतात, तशीच मनाची मरगळ, विचारांचा गुंता रोज सोडवावा लागतो. मानसिक आरोग्यासाठी दररोज किमान एक तास स्वतःसाठी राखीव ठेवून काम करावे लागते. कधी-कधी मोकळेपणाने व्यक्त व्हायला अनेक जागा, मित्र-मैत्रिणी असतात. मात्र, गरज पडते तेव्हा तज्ज्ञांची मदत घ्यायलाच हवी.’  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अद्याप समाज म्हणून आपण मानसिकदृष्ट्या साक्षर झालो नाही. आपल्याला स्वाभाविक भावना ओळखण्याची शिकवण नाही. मुळात मानसाच्या मनाचा ठाव घेणे अवघड असते. आत्महत्येचा विचार करणारा माणूस, तर कमालीचा विरोधाभासी असतो. तो रोजच्या कामांचे नियोजन करतो. मात्र, त्याच वेळी त्याची आत्महत्या करायची तयारी चालू असते. आपल्याला त्रास होतो हे  स्विकारले की, बाहेर पडण्याचे मार्ग सापडतात. टोकाची भावना गाठण्याआधी मनाला थांबवता येते.’ – संदेश कुलकर्णी, नाटककार-लेखक