पुणे : इतिहासाची मोडतोड करणे, विद्रूपीकरण करून आजच्या तरुणांची दिशाभूल करण्यात येत आहे. गेल्या १० वर्षांतील सरकारचे अपयश झाकण्यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना बदनाम केले जात आहे. भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व देण्याचा अमेरिका, रशियाकडून प्रस्ताव देण्यात आला होता, अशा अफवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पसरविल्या आहेत. अफवा पसरविण्यात संघ वस्ताद असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार यांनी शनिवारी केली.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी विकसित भारताचा संकल्प अंतर्गत ‘जर्नी ऑफ ग्लोबल राइज ऑफ इंडिया’ या विषयावर पुण्यातील युवकांशी शुक्रवारी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी काही विधाने केली होती. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. अभय छाजेड, मोहन जोशी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?

पवार म्हणाले, की सन १९५०-५५ मध्ये संघाने भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची अफवा पसरविली होती. आता पुन्हा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तेच बोलत आहेत. अलीकडेच चीनने भारताचा लडाखमधील चार हजार चौरस मीटर प्रदेश बळकावला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आवाज उठविला आहे. दोन गावे आणि तळ्यांसाठी नेपाळ हा देश भारतावर गुरगुरत असून, त्याला आपण शांत करू शकत नाही. मालदिवसारखा छोटा देश भारताच्या सैन्याला हाकलून देत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर एक शब्दही बोलत नाहीत. मात्र, गेल्या १० वर्षांतील आपले अपयश झाकण्यासाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना बदनाम केले जात आहे.