पुणे : ‘सभागृहात मतभेद होतील, मतभिन्नता येईल. मात्र, तिथे साधकबाधक चर्चा झाली पाहिजे, असा आदर्श विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या वारकरी सांप्रदायातील भारदे यांनी घालून दिला. मात्र, सध्या सभागृहातील वातावरण रसाळ नव्हे, तर रटाळ झाले आहे,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पवार यांच्या हस्ते सोलापूर येथील शिक्षक दत्ता गोसावी यांना प्रा. डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत ‘प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, डॉ. आनंदिता क्षीरसागर या वेळी उपस्थितीत होते.
पवार म्हणाले, ‘बाळासाहेब भारदे विधानसभेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी झालेल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या ओवीचा दाखला देऊन ‘साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे’ असे सभागृहाचे वातावरण असायला हवे, हे सांगितले. सभागृहात मतभेद होतील, मतभिन्नता येईल. मात्र, तिथे साधकबाधक चर्चाच झाली पाहिजे, असा आदर्श वारकरी सांप्रदायातील भारदे यांनी घालून दिला. मात्र, सध्या सभागृहातील वातावरण रसाळ नव्हे, तर रटाळ झाले आहे.’
प्रा. जोशी म्हणाले, ‘ग्रामीण भागात सकस आणि रसदार साहित्याची निर्मिती होत आहे. संतांनी अध्यात्माचे लोकशाहीकरण केले. त्यांनी जातीपातींचे भेद दूर करून समाजाचे प्रबोधन केले. त्याच समाजात आज राजकारणामुळे सामाजिक वीण उसवत चालली आहे. संत विचारांच्या या भूमीत समता प्रस्थापित व्हायला हवी, ती प्रत्यक्षात उतरायला हवी.’ पवार यांनी प्रस्ताविक केले. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले, आभार मानले.
लहानपणापासून संत वाङ्मयाचे संस्कार होत गेले. अनेक माध्यमांतून संत साहित्याबद्दल येणारे लेख, विचार वाचत होतो. संतांच्या प्रेरणेतूनच लिखाणाची ऊर्जा मिळाली. – दत्ता गोसावी, पुरस्कारार्थी