पुणे : ‘पर्यावरणाबाबत चुकीच्या गोष्टी घडत असताना माहिती संकलित केली पाहिजे, त्यांचे दस्तऐवजीकरण केले पाहिजे. आजच्या तंत्रज्ञानामुळे अभ्यास करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे अधिकाधिक अभ्यास करून लोकांपुढे आणणे, वेगवेगळ्या माध्यमांतून जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी मांडले. राष्ट्रसेवा दलातर्फे ‘पेरते व्हा… कार्यकर्त्यांची संगति’ या कार्यक्रमात डॉ. गाडगीळ बोलत होते. कर्नल (नि.) सुधीर पाटील, प्रा. नीरज हातेकर, प्रा. गुरुदास नूलकर या वेळी उपस्थित होते. पर्यावरणासंदर्भात राज्यव्यापी कृती कार्यक्रम हाती घेण्यासंदर्भात या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली.
गाडगीळ म्हणाले, ‘उजनी धरणात, भीमा नदीत प्रदूषित पाणी सोडल्यामुळे तेथील मासेमारी नष्ट होऊ लागली. प्रदूषित पाण्यामुळे त्वचाविकार होतात, असे तेथील मच्छिमारांनी सांगितले होते. डॉ. संजय खरात यांनी याबाबत अभ्यास करून पाण्याची गुणवत्ता खराब असल्याचे, मासे, कासवांच्या जाती नष्ट होत असल्याचे दाखवून दिले. तथाकथित पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यासाठी डोंगर फोडून खडी केली जाते.हा खडी करण्याचा धंदा किफायतशीर आहे. पश्चिम घाटात अशा खाणी बोकाळल्या आहेत. केरळमध्ये झालेल्या अभ्यासात ८५ टक्के खाण प्रकल्प बेकायदा असल्याचे दिसून आले. २०१० ते २०२० या काळात भूस्खलाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले, त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. वनविभागाइतकी भ्रष्ट, दुष्ट आणि विज्ञानाच्या विरोधात दुसरी यंत्रणा नाही. आज समाजात मोठी दरी निर्माण झाली आहे. आरक्षण, जातींच्या मुद्द्यांवरून समाज भडकतो आहे.’
‘पर्यावरणाबाबत विचार करताना प्लॅस्टिक, झाडे लावणे याच्या पलीकडे गेले पाहिजे. पर्यावरण प्रश्नांचे राजकीय, आर्थिक हितसंबंध समजून घेतले पाहिजे. विकासाचा फायदा आपल्याला झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विकास नको ही भूमिका योग्य नाही. आज जीडीपीबाबत खूप बोलले जाते. मात्र, जीडीपी आणि मानवी कल्याणाचा काहीही संबंध नाही.
हवामान बदलाचा फटका नेमका कोणाला बसणार याची आकडेवारी नाही. ती तयार केली पाहिजे. वैयक्तिक निर्णयांपेक्षा व्यवस्था म्हणून पर्यावरणाचा विचार होणे गरजेचे आहे, असे प्रा. हातेकर यांनी सांगितले. तर धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांना वाटला. त्या सुपीक गाळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. पुढील वर्षभरात ७० लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे,’ असे कर्नल पाटील यांनी नमूद केले.