लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘पर्यावरणाचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता निर्माण व्हायला हवी. पर्यावरण संवर्धनासाठी योग्य पावले न उचलल्यास मनुष्यजातीचा अंत समीप आहे,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी बुधवारी व्यक्त केले.

किर्लोस्कर वसुंधरा फाउंडेशनतर्फे आयोजित ‘किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, किर्लोस्कर समूहाचे मनुष्यबळ विकास अधिकारी असीम श्रीवास्तव, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष आर. आर. देशपांडे, संयोजक वीरेंद्र चित्राव यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक डॉ. सुरेश मिजार, अर्किटेक्ट यतीन मोघे आणि अर्किटेक्ट सरिता झांबरे, सुवर्णा भांबूरकर, अर्जुन नाटेकर, तुषार सरोदे आदी या वेळी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड डी. एस. कदम सायन्स कॉलेजने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक राजकोट येथील आत्मीय युनिव्हर्सिटीने, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक नाशिक येथील पी. व्ही. जी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड एस. एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने पटकावले. कर्नाटकातील होसपेट येथील श्री गवीसिद्धेशवरा डिग्री कॉलेज, पिंपरी – चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथील डी. डी. टी. एस. मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, अहमदाबाद येथील सिल्व्हर ओक युनिव्हर्सिटी आणि खडकी येथील टिकाराम जगन्नाथ कॉलेज यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

डॉ. आगाशे म्हणाले, ‘पर्यावरणासंदर्भात विद्यार्थीदशेमध्ये संवेदनशीलता वाढवता आल्यास ते विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक होतील. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाटक, लघुपट ही माध्यमे यासाठी अत्यंत प्रभावी माध्यमे ठरू शकतात.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सगळ्या जगात पर्यावरणाचे असंतुलन ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, पर्यावरण संवर्धनासाठी तरुण मुले अधिक प्रयत्नशील दिसतात. त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य आहे. हे आशादायी चित्र असले, तरीही पर्यावरण वाचायचे असेल, तर युवकांनी पर्यावरणीय दूत होण्याचा निर्धार केला पाहिजे,’ अशी अपेक्षा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. त्रिवेणी माथूर यांनी सूत्रसंचालन केले.