पुण्याची ‘सिरम इन्स्टिटय़ूट’ आणि नेदरलँडची ‘बिल्टथॉवन बायोलॉजिकल्स बी. व्ही.’ या कंपन्यांतर्फे युनिसेफच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसाठी अल्प दरात पोलिओ प्रतिबंधक लस पुरवण्याचे मान्य केले आहे. युनिसेफच्या या मोहिमेत २०१८ पर्यंत पोलिओ जगातून हद्दपार करण्याचे लक्ष्य आहे.
‘इनॅक्टिव्हेटेड पोलिओ लसी’च्या (आयपीव्ही) जागतिक स्तरावरील दरात युनिसेफच्या मोहिमेसाठी लक्षणीय कपात करून ती देणार असल्याचे सिरम इन्स्टिटय़ूटने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गरीब देशांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असून भविष्यात आयपीव्हीच्या किमतीत आणखी घट करता येईल, असेही कंपनीने म्हटले आहे.
सिरम इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला म्हणाले, ‘‘शक्य तितक्या अल्प दरात पोलिओ प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जागतिक आरोग्य संघटनेला दिले होते. त्यानुसार पोलिओ निर्मूलनासाठीच्या जागतिक मोहिमेसाठी आम्ही साहाय्य करत आहोत. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर संशोधनात्मक प्रयत्नही करण्यात आले असून त्यामुळे भविष्यात आयपीव्हीच्या किमतीत आणखी घट होऊ शकेल.’’