पुणे : शिवाजीनगर पोलीस वसाहतीच्या आवारात असलेल्या अधिकारी वसाहतीतील मल:निस्सारण वाहिनी तुंबल्याने आठवडापासून रहिवासी दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत. पोलीस वसाहतीतील रहिवाशांनी महापालिका, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दिल्यानंतर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गणेशखिंड रस्त्याावर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात अधिकारी वसाहत आहेत. या वसाहतीत पाच इमारती असून, तेथे साधारपणे १०० अधिकारी राहायला आहेत. पोलीस निरीक्षक, उपअधीक्षक,सहायक निरीक्षक दर्जांचे अधिकारी या वसाहतीत कुटुंबीयांसह राहायला आहेत. पुणे पोलीस दल, ग्रामीण, लोहमार्ग, राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) अधिकारी वसाहतीत राहायला आहेत. वसाहतीची देखभाल, दुरस्तीचे कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात. आठवाडाभरापूर्वी वसाहतीतील मल:निस्सारण वाहिनी तुंबली. त्यामुळे वसाहतीत दुर्गंधी पसरली असल्याच्या तक्रारी वसाहतीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केल्या.

याबाबत सार्वजिनक बांधकाम विभाग, महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारही करण्यात आली. मात्र, अद्याप कोणीतही कार्यवाही झाली नाही. दुर्गंधीमुळे अधिकारी वसाहतीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. अधिकारी वर्ग दिवसभर कामात असतो. मात्र, कुटुंबीय आणि मुले दिवसभर घरी असतात. साचलेल्या पाण्यामुळे घाणेरडा वास येत असून, तळमजल्यावरील रहिवाशांना याचा अधिक त्रास होत आहे. याबाबत पोलीस मुख्यालयाच्या उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे अधिकारी वसाहतीतील रहिवाशांनी सांगितले.