पुणे : बांधकामातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्याप्रकरणी शापूरजी पालनजी या कंपनीला महापालिकेडून एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
शापूर्जी पालमजी ग्रुपच्या वतीने शेवाळेवाडी येथे जाॅयविले या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांनी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र या गृहप्रकल्पाचे काम करताना उपाययोजनांचे पालन केले जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक आणि भाजपाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. या प्रकल्पाचे बांधकाम थांबविण्यात यावे, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली होती.
हेही वाचा – पुणे : रेल्वेची ‘दिवाळी’; उत्पन्नाची गाडी सुसाट…
या पार्श्वभूमीवर हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाकडून बांधकाम प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. त्यावेळी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आले नसल्यामुळे एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकणाऱ्या ४८ नागरिकांवरही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा – पुणे विमानतळाबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आता चेंडू सरकारच्या कोर्टात
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम परिमंडळ चारचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, वरीष्ठ आरोग्य निरीक्षक संजय धनवट, आरोग्य निरीक्षक विकास मोरे, मुकादम दत्ता पोळ आणि रवी क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.