बारामती : ‘लोकसभा निवडणुकीवेळी रात्री बारा वाजता बँक उघडून सेवा दिली गेली. आता पुन्हा तशीच परिस्थिती आहे,’ अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामतीतील मुख्य शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा आणि त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखाान्याच्या निवडणुकीच्या मतदार याद्या आढळून आल्याच्या आरोपाप्रकरणी चौकशीसाठी सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्यासह पोलीस आणि महसूल प्रशासनाची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्या संदर्भात पवार यांनी हे विधान केले. ‘ज्यांच्या हातात कारभार आहे, ते ठरवतील,’ अशी टिप्पणीही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी (२२ जून) मतदान होत आहे. बुधवारी (१८ जून) रात्री जिल्हा बँकेची बारामतीतील मुख्य शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे या दोघांशी संबंधित व्यक्ती त्या वेळी बँकेत उपस्थित होत्या. तसेच, तेथे माळेगावच्या मतदार याद्या आणि अन्य साहित्य आढळून आले,’ असा आरोप सहकार बचाव पॅनेलचे रंजन तावरे यांनी केला.

या प्रकरणी बँकेचे सहायक शाखा व्यवस्थापक संजय जगदाळे म्हणाले, ‘बँक सायंकाळी साडेपाच वाजता बंद होते. बँक सुरू असल्याचे समजल्यावर रात्री बँकेत आलो. मी आणि रंजन तावरे एकाच वेळी तेथे पोहोचलो. बँकेच्या वरील मजल्यावर संगणकीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथे लोक बराच वेळ उपस्थित असतात. माळेगावच्या याद्या कशा सापडल्या, हे सांगता येणार नाही.’ निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने म्हणाले, ‘रात्री अकरा वाजता बँक सुरू का होती, याचा खुलासा मागितला आहे. याशिवाय सहायक निबंधक, पोलीस निरीक्षक, मंडल अधिकारी यांची समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या अहवालावर पुढील बाबी ठरतील. तावरे यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.’

‘आचारसंहितेच्या पथकाला न्यायदंडाधिकाऱ्यांचे अधिकार असतात. संबंधित घटनेची सखोल चौकशी करून ते अहवाल सादर करतील. त्यानुसार काही चुकीचे घडले असेल तर पुढील कायदेशीर कारवाई होईल,’ असे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘एसआयटी’ चौकशी करा’

‘माळेगाव साखर कारखान्याचे मतदान दोन दिवसांवर आले असताना, बारामतीतील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा रात्री उशिरापर्यंत उघडी कशी असू शकते,’ असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. ‘बँकेला याचे उत्तर द्यावे लागेल. या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.