बारामती : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत आंदोलन करण्यात आले. बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांच्यासह तालुक्यातील विविध वकील आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी मौन पाळत आंदोलन केले.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, देश  संविधानानुसार चालतो. मात्र, हे समाजातील वितृष्ट कशामुळे निर्माण झाले आहे, हे शोधण्याची गरज आहे. या देशाला आता आत्मचिंतनाची गरज आहे.  सरन्यायाधीश पद हे देशाच्या लोकशाहीचे सर्वोच्च पद आहे. या पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारचा हल्ला करणे हे अत्यंत निषेधार्थ असून, हा देशातील काळ दिवस आहे. भूषण गवई हे अमरावतीचे म्हणजेच महाराष्ट्राचे असले तरी आज संपूर्ण देशाचे मानाचे स्थान असलेले सरन्यायाधीश आहेत. त्यांच्या बाबतीत असे होण्यामुळे या देशातील कायदा आणि सुव्यवस्था कोणत्या स्तरावर येऊन पोहोचले आहे हे आपल्या लक्षात येते.‌

पवार कुटुंबियांची यंदा दिवाळी नाही?

यंदा महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. तसेच काकीचे निधन झाले आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करायची की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. कुटुंबात अजून तशी चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.