नारायणगाव : पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा आणि त्याबाबतची अधिसूचना काढावी, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. महामार्ग रद्द न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

शेतकरी संघर्ष समितीची बैठक समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांच्या उपस्थितीमध्ये झाली. राजुरी गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, शेतकरी संघर्ष समितीचे सहप्रमुख वल्लभ शेळके, समितीचे समन्वयक एम.डी. घंगाळे, मोहन नाईकवाडी, गोविंद हाडवळे, प्रतीक जावळे, दिलीप जाधव, अविनाश हाडवळे तसेच खेड, जुन्नर, आंबेगाव तसेच शिरूर तालुक्यातील शेतकरी समितीचे सदस्य उपस्थित होते.

संघर्ष समितीने अनेक आंदोलने केली. मात्र, त्याबाबत निर्णय होत नसल्याने तीव्र आंदोलन उभारावे लागेल. यासंदर्भात सर्व बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवून देण्याची आवश्यकता आहे, असे औटी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग रद्द करावा तसेच अन्य विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी राजुरी येथे बेमुदत उपोषण केले होेते. त्या वेळी खासदार डाॅ. अमोल कोल्हे आणि जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी यासंदर्भात चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही तसे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही महामार्ग रद्द करण्यासंदर्भातील अधिसूचना निघाली नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने हा इशारा दिला आहे.