शिरूर : गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यामुळे त्रस्त असलेल्या पिंपरखेड, जांबूत परिसरास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी पिंपरखेड येथे भेट देऊन बोंबे कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव राज्य सरकारडून केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचे डुडी यांनी सांगितले.
या वेळी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, प्रांताधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, सहायक वनसंरक्षण अधिकारी स्मिता राजहंस, देवदत्त निकम आदी उपस्थित होते. पिंपरखेड येथे रविवारी बिबट्याने केलेले हल्ल्यामध्ये रोहन विलास बोंबे हा १३ वर्षांचा शाळकरी मुलगा मृत्युमुखी पडला. तसेच, शिवन्या बोंबे, भागुबाई जाधव हेदेखील बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले. बिबट्यांचा प्रश्न शासनाने कायमस्वरूपी मार्गी लावावा, यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनासह रोहनच्या मृतदेहाचे शवविच्छेदनास विरोध केला होता. या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी डुडी यांनी पिंपरखेड येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘बिबटे पकडण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे. सव्वाअकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वन विभागाला आवश्यक असलेले मनुष्यबळ, पिंजरे, कॅमेरे, गस्तीसाठी वाहने यासाठी हा निधी असणार आहे. बिबटे पकडण्यासाठी कुशल मनुष्यबळाची मागणी शासनाकडे केली जाणार आहे. बिबट्याला वन्य संरक्षण कायदा शेड्युल्ड एकमधून दोनमध्ये घेणे, नसबंदीचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. केंद्रीय वनमंत्री यांच्याबरोबर बैठक घेतली जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळ मागितली आहे.’
दरम्यान, पिंपरखेड आणि जांबूत परिसरात गेल्या १५ दिवसांत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन लहान मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश मुख्य वनरक्षक यांनी दिला आहे. त्यासाठी पिंपरखेड, जांबूत येथे पथक तैनात केली आहेत. जांबूत, पिंपरखेड, चांडोह, काठापूर या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ३५ पिंजरे लावण्यात आले आहेत. शिरूर शहरातील नदीकाठी अमरधाम, सुशीला पार्क आणि सूरजनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक पातळीवर समित्या
‘या परिसरातील बिबटे बिबट निवारण केंद्रात सोडण्यात येतील. परिसर बिबटमुक्त करण्यात येईल. वन विभाग आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी स्थानिक पातळीवर समित्या करण्यात येणार आहेत’, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
