शिरूर : पिंपरखेड येथे मंगळवारी सकाळी एक बिबट्या जेरबंद करण्यात आल्याची माहिती तालुका वनाधिकारी नीळकंठ गव्हाणे यांनी दिली. या बिबट्याला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा पुनवर्सन केंद्रात हलविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.पिंपरखेड परिसरात गेल्या १५ दिवसांत तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व वन विभागाने या परिसरातील बिबटे जेरबंद करण्यासाठी जाबुत, पिंपरखेड, चांडोह या परिसरात ४३ पिंजरे लावले आहेत. बिबट्या वन खात्याने लावलेल्या सापळ्यात सापडला.

गव्हाणे म्हणाले, ‘पकडण्यात आलेला बिबट्या रोहन बोंबे या मुलावर जेथे हल्ला झाला, त्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर जेरबंद करण्यात आला. पकडलेला बिबट्या नर असून, तीन ते चार वर्षाचा आहे.’ जेरबंद केलेल्या बिबट्यास तेथून हलविण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने तो जेथे जेरबंद करण्यात आला तेथेच ठेवण्यात आला असल्याचेही गव्हाणे यांनी सांगितले. बिबट्या येथून न हलविता त्यास मारण्यात यावे, असा ग्रामस्थांचा आग्रह आहे. गावात रेस्क्यू या स्वयंसेवी संस्थेचा चमू दाखल झाला असून, त्यात दोन शार्प शूटरचाही समावेश असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यात बिबट्याने तीन जणांचा बळी घेतल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले होते. पुणे-नाशिक महामार्गावर जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील ग्रामस्थांनी रास्ता रोकोही केले. त्या पार्श्वभूमीवर, वन विभागाने बिबट्या दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते.

पकडलेला बिबट्या हल्ला करणारा, की अन्य?

पकडलेला बिबट्या हा रोहन बोंबे याचा प्राण घेणारा आहे, की अन्य कुणी, याबाबत खात्री झाली नसल्याचे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने वन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. या बिबट्याला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा पुनवर्सन केंद्रात हलविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.