शिरूर : शिरूर शहरातील गुजर कॉलनी परिसरात मोकाट श्वानांनी नागरिक हैराण झाले असून, दोन श्वानांनी सहा वर्षांच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना गेल्या रविवारी घडली. मोकाट श्वानांनी आतापर्यंत १७ पेक्षा अधिक लहान मुलांना चावा घेतला आहे. त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली आहे.
शिरूर शहर आणि उपनगरात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. या श्वानांमुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. यावेळी शिरूर नगर परिषदेचे माजी सभापती विठ्ठलराव पवार, सविता वाबळे, संध्या दारोळे, सविता बोरुडे, छाया यादव,धनश्री मच्छिंद्र कदम, नंदा संतोष नवले, राजश्री रोकडे, सिंधू सोमनाथ पळसकर, पूजा भास्कर हरिहर, प्रीती प्रकाश बनसोडे, पूजा भोंडवे, सुप्रिया गावडे, रश्मी जगदाळे, नितीन यादव, आशिष पळसकर, दत्तात्रय शेलार, महेश कुरंदळे, महेश पठारे, सुहास वाबळे आदी उपस्थित होते.
याबाबत पालिकेचे स्वच्छता अधिकारी दत्तात्रय बर्गे म्हणाले, ‘शिरूर शहरातील मोकाट श्वानांचे गेल्या दोन वर्षांपासून निर्बिजीकरण करण्यात येत आहे. गुजर कॉलनी परिसरातील श्वानांना पकडण्याचा प्रयत्न पालिकेच्या पथकाने वारंवार केला आहे. मात्र, त्यांना अद्याप पकडता आलेले नाही. याबाबत मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना अहवाल सादर करून कार्यवाही करण्यात येणार आहे.’