पुणे : शिवसेनेच्या (शिंदे) जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची क्षमता बांधणी कार्यशाळा आज, मंगळवारी (१३ मे) होणार आहे. घोले रस्त्यावरील पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.उद्घाटनाच्या सत्रास माजी खासदार आनंद अडसूळ, तर समारोपाला गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

डाॅ. गोऱ्हे म्हणाल्या की, आपत्ती आणि युद्धजन्य परिस्थतीमधील कार्यपद्धती, प्रभावी संवाद कौशल्य आणि नेतृत्वगुण, सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा संघटनात्मक वापर, तणावमुक्त मन आणि मानसिक आरोग्य, महिलांचे आरोग्य आणि सुरक्षा; तसेच पक्षाची आर्थिक शिस्त आणि नियोजन या सात विषयांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी पंधरा कार्यकर्ते या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, युवासेना आणि अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.