पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज रविवारी (३१ जुलै) ईडीने नऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलं असून, त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणलं गेलं आहे. आज सकाळीच ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी पोहचलं होतं आणि त्यांची चौकशी सुरू झाली होती, अखेर ईडीचे अधिकारी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात गेले. या कारवाईच्या निषेधार्थ आता शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे, पुण्यातील सारसबाग चौकात शिवसेनेने शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले. याशिवाय राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत.
PHOTOS : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह ; ‘ईडी’चे पथक सकाळीच घरी दाखल
रास्ता रोको आंदोलन करताना शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी भाजपावर टीका करताना म्हटले की, “महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोठा पुढाकार होता. गेली अडीच वर्षे ते सकाळी उठून माध्यमांसमोर येऊन भाजपाला ठोकत होते. याचा कुठेतरी राग त्यांनी (भाजपा) मनात धरला. मागील दीड महिन्यापासून त्यांना नोटीस काढत होते, ज्या दिवशी नोटीस काढली त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावलं. त्या दिवशी त्यांना अटक का केली नाही? तुम्हाला तपास करायला दीड महिना का लागला? जर तुम्ही अडीच वर्ष तपास केला होता. तर दीड महिन्यापूर्वीच त्यांना अटक करायला पाहिजे होती. काल राज्यपालांनी जे वक्तव्य केलं, त्यानंतर जे राज्यभर आंदोलन झालं. त्याचा निषेध संपूर्ण माध्यमांनी दाखवला. ती बातमी कुठं तरी थांबली पाहिजे, म्हणून आज रविवारी संजय राऊत यांना अटक केली.”
… तर दीड महिन्यापूर्वीच त्यांना अटक करायला पाहिजे होती –
तसेच, “ही अटक अतिशय निषेधार्ह आहे, खोटी आहे. ही आकसाने अटक केलेली आहे. जो भाजपात प्रवेश करतो, तो धुतल्या तांदळासारखा होतो. जो भाजपाच्या विरोधात बोलतो त्याच्याविरोधात ईडीची कारवाई होते. सीबीआय, आयटीची कारवाई होते. संपूर्ण देशातील नागरिकांनी केवळ भाजपाचाच झेंडा हातात घ्यायचा का? म्हणजे या देशात गुन्हा राहणार नाही, असं या मोदी सरकारला सांगायचं आहे? त्यांनी समोर येऊन सांगावं, संपूर्ण देश त्यांच्या मागे उभा राहील. म्हणजे आपल्या देशात गुन्हे घडणार नाही, पोलिसांची गरज नाही. ही कारवाईची कुठली पद्धत आहे. मग सरकारच्या विरोधात कोणी बोलायचं नाही का? सगळ्यांनी तोंड बंद ठेवून घरी बसायचं का? जे महाविकास आघाडी सरकार फोडलं. त्यातील आमदारांना धमकी दाखवली, ईडीची धमकी दिली ते सगळे आता धुतल्या तांदळासारखे झाले का? त्यांच्यावर कारवाई या अगोदर झाली आहे त्यांना देखील अटक करा. जे होते त्यांना अटक करा. जे भाजपाच्या विरोधात बोलतं त्यांना अटक होते, उद्या माझ्यावरही कारवाई होईल, मग मलाही अटक करा.”
