scorecardresearch

“…तर माझा धंगेकरांसारखा विजय झाला असता”, पराभवानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचं विधान

राहुल कलाटेंनी नवनिर्वाचित महिला आमदार अश्विनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या.

“…तर माझा धंगेकरांसारखा विजय झाला असता”, पराभवानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचं विधान
राहुल कलाटें

महाविकास आघाडीकडून मीच सक्षम उमेदवार होतो. मला उमेदवारी दिली असती तर धंगेकरांसारखा विजयी झालो असतो. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला डावलायला नको होतं. अशी खदखद बंडखोर राहुल कलाटेंनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी पिंपरीतील वाकड येथे बोलत होते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवार, बंडखोर राहुल कलाटेंची जोरदार चर्चा झाली. आज झालेल्या मतमोजणीत भाजपा च्या अश्विनी लक्ष्मण जगताप या ३६ हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या.

हेही वाचा >>> पुणे : आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

आजच्या पोटनिवडणूकीवर भाष्य करताना राहुल कलाटे म्हणाले की, ही निवडणूक विकास कामांवर होईल अशी वाटली. प्रत्येक्षात मात्र, सहानुभूती आणि प्रतिष्ठेची निवडणूक झाली. माझा पराभव झाला असला तरी मी कुठं चुकलो याचा शोध घेत आहे. भाजपा आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही पक्षांनी ताकद मोठी होती. मी, जनतेच्या जीवावर ही निवडणूक लढवत होतो. पुढे ते म्हणाले की, महाविकास आघाडी कडून मी लढण्यास तयार होतो. मीच सक्षम उमेदवार होतो. मला उमेदवारी मिळाली असते तर धंगेकरांसारखा विजयी झालो असतो. या मतदार संघात तशी अनुकूल परिस्थिती होती.  मला डावलायला नको होत. अशी खदखद कलाटे यांनी व्यक्त केली. २०१४ ला पुन्हा निवडणूक होणार आहे. त्याची तयारी मी करणार आहे. पण, ते कुठल्या पक्षाकडून लढणार किंवा पक्षात असणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. यावेळी राहुल कलाटेंनी नवनिर्वाचित महिला आमदार अश्विनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 22:35 IST