पुणे : मागील काही महिन्यापासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने भेटीगाठी होत आहे.यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगू लागली.त्या सर्व घडामोडी दरम्यान शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पुणे दौर्‍यावर आले होते.त्यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी योगेश कदम यांनी महायुती सरकार मार्फत राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या योजनेची माहिती देखील त्यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला फटका बसेल का त्या प्रश्नावर योगेश कदम म्हणाले,ते दोघेजण केवळ मराठी मतांसाठी एकत्र येत आहेत.दुसर्‍या कोणत्याही मुद्द्यांसाठी ते एकत्र येत नाहीत.मुंबई महापालिकेवर आपली सत्ता मिळवयाची, त्यासाठी लागणारे मराठी मतदार जे आपल्यापासून दूर गेले आहेत.त्या मतदारांना आपलस करण्यासाठी ते दोघेजण एकत्रित येत आहे.

तसेच लोकसभा निवडणुकी दरम्यान दाऊद सोबत एक हात केलेल्या व्यक्तीने त्यांच्या मिरवणुकीमध्ये जे हिरवे झेंडे नाचवले.ते आपल्या अंगाशी आल्याने, आपल्यापासून मराठी माणुस लांब गेलेला आहे.त्याला जवळ आणण्याकरिता आपण जर एकत्र आलो,तरच ते शक्य होईल.त्याच गोष्टीसाठी ते एकत्र येत आहे.ही सर्व बाब लोकांना माहिती आहे.तसेच मराठी माणूस हा फक्त त्यांच्यासोबतच नाही.आम्हाला ज्यांनी मतदान केले.तो देखील मराठी माणूसच आहे.त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न काही यशस्वी होणार नाही आणि केवळ मुंबईसाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले,मुंबईमधून मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर बाहेर गेला आहे.त्या सर्वांना मुंबईत आणण्यासाठी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले पाहिजे होते.मात्र त्यांनी मराठी माणसाच्या दृष्टीने कोणतेही निर्णय घेतले नाही.जर मुंबईत मराठी माणूस आणण्याचा असेल सुरवातीला परवडणारी घर उपलब्ध करून देणे गरजेचे होते.ती गोष्टी ते करू शकले नाही.पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सुरुवातीला गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावला.त्यांनी अनेक निर्णय घेतले पण मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांनी एक निर्णय घेतलेला दाखवावा, अशा शब्दात ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.