पुणे : प्रत्येक मुलीने उच्च शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र तरी देखील शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी घरची परिस्थिती हलाकीची असल्याने इयत्ता ७ वी नंतर मुली पुढील शिक्षण घेत नसल्याच चित्र आहे. त्या मुलींना एक तर घरातील काम किंवा लग्न लावून दिल्याच्या घटनासमोर आल्या आहेत.

अशीच घटना विद्येच माहेरघर म्हणून ओळख असणार्‍या पुण्यात होता होता राहून गेली आहे. इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे तिचे शिक्षण बंद करून दिवाळीनंतर लग्न लावून देण्याच्या विचारात तिचे कुटुंबीय होते. पण त्या कुटुंबीयांचे पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांनी समुपदेशन केल्याने लग्न रोखणे शक्य झाले आहे. यामुळे ती मुलगी आता पुन्हा एकदा शाळेत जाऊ शकणार आहे. तर दुसर्‍या बाजूला सोनाली हिंगे यांच्या कार्याच सर्व स्तरातून विशेष कौतुक केल जात आहे.

याबाबत सोनाली हिंगे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, आमच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शाळेतील शिक्षकांचा फोन आला की, आमच्या शाळेत इयत्ता ७ वी मध्ये एक मुलगी आहे. ती खूप हुशार आहे. पण मागील आठ ते दहा दिवसापासून ती शाळेत आली नाही. तिच्या मैत्रिणीकडून समजले की, तिचे लग्न लावण्याचा तिचे आई आणि वडील विचार करीत आहे. याबाबत माहिती मिळताच,आमचे वरीष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या मुलीच्या घरी गेलो.

त्या कुटुंबीयाकडे चौकशी केली असता ते कुटुंब बीड येथून चार वर्षांपूर्वी कामानिमित्त पुण्यात आले. त्यानंतर शहरातील फुटपाथवर मुलीचे वडील वस्तू विक्री आणि आई घरकाम करते.त्यातून त्यांचे घर चालते,तर त्यांना चार मुली असून चार मुलीपैकी मोठी मुलगी ही इयत्ता 7 वी मध्ये आहे. तर तिचेच लग्न ठरविण्याचे नियोजन दसरा झाल्यावर गावी जाऊन दिवाळीमध्ये लग्न करणार होते, अशी माहितीसमोर आली. मुलींच्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने तिला शाळेत पाठवण्यापेक्षा तिला मुलगा शोधून लग्न लावून देण्याचा सल्ला तिच्या पालकांना त्यांच्या नातेवाईकांनी दिला होता.त्यामुळे आम्ही तिची शाळा बंद करुन तिला घरी ठेवले,अशी कबुली मुलीचे वडील आणि आईने दिली.

शिक्षणाने एक पिढी घडते, परिस्थिती सुधारते. जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला,तर मुलींच आयुष्य सुद्धा मोल मजुरीमध्ये जाईल हे सांगितले.कमी वयात लग्न लावून दिल्यास आम्ही आई आणि वडील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करू असे सांगितले असता, ती मुलगी रडायला लागली आणि माझ्या पप्पाना पकडून घेऊन जाऊ नका, असे म्हणू लागली. त्यावेळी मुलगी आपला एवढा विचार करते आणि आपण तीच भविष्य उध्वस्त करत आहोत, या गोष्टीची जाणीव तिच्या वडिलांना झाली आणि ते देखील रडायला लागले. त्यानंतर त्यांनी त्या मुलीला आणि इतर तीन मुलींना हवे तेवढे कष्ट करु,पण मुलींना शिकवू असा निर्णय घेतला, लग्ना बाबत देखील मुलीचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला लागल्याशिवाय लग्न करणार नाहीत अशी ग्वाही दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.