पिंपरी : परवानाधारक रिव्हॉल्व्हर निष्काळजीपणे बाळगल्यामुळे एका व्यक्तीच्या स्वतःच्या पायात गोळी लागली. ही घटना २७ ऑगस्ट रोजी कुरळी गावात घडली. पोलीस हवालदार सदाशिव नाईकनवरे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर गुलाब सोनवणे (३५, सोनवणे वस्ती, कुरळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरने त्याच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्व्हर बाळगताना परवान्याच्या अटी व शर्तींचे पालन केले नाही. या निष्काळजीपणामुळे रिव्हॉल्व्हरमधून राऊंड फायर होऊन त्याच्या स्वतःच्या डाव्या पायात गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

म्हाळुंगेत कंपनीतील सांडपाण्यामुळे १८ मेंढ्यांचा मृत्यू

म्हाळुंगे इंगळे येथील कंपन्यांमधून सोडलेल्या दूषित सांडपाणी पिल्यामुळे १८ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.या प्रकरणी मेंढपाळाने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंपन्यांच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी मेंढ्या चारत असताना, कंपन्यांमधून नाल्यात सोडलेले दूषित सांडपाणी १८ मेंढ्यांनी प्यायले. त्यामुळे त्यांच्या नाका-तोंडातून फेस आणि पाणी येऊन त्यांचा मृत्यू झाला. कंपनी प्रशासनाला याची जाणीव असतानाही त्यांनी हे दूषित पाणी बाहेर सोडले, ज्यामुळे सुमारे दोन लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले, असे फिर्यादीने म्हटले आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

निगडीत चुलत्याकडून पुतण्यावर जीवघेणा हल्ला

कौटुंबिक वादातून चुलत्याने आपल्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना निगडीत घडली.या प्रकरणी महेश ज्ञानोबा काळभोर (३५, समर्थ नगर, निगडी, पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुकाराम सखाराम काळभोर (६०, समर्थ नगर, निगडी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम हे फिर्यादीचे चुलते आहेत. त्यांनी फिर्यादीच्या कर्मचाऱ्यास वाहने उभी करण्यावरुन शिवीगाळ केली. फिर्यादीचा भाऊ जाब विचारण्यासाठी गेला, या कारणावरून आणि जुन्या भांडणाच्या रागातून आरोपीने लोखंडी फावड्याने फिर्यादीच्या भावाच्या डाव्या भुवईवर मारून गंभीर दुखापत केली. तसेच, “तुम्हा सर्वांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देऊन निघून गेले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

वर्गणीच्या नावाखाली खंडणी

काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजिंगच्या व्यवस्थापकाला गणपती वर्गणीच्या नावाखाली पैशांची मागणी करून धमकी देण्यात आली.याप्रकरणी व्यवस्थापकाने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीकडे गणपती वर्गणी म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी फिर्यादीला १२०० रुपयांची पावती देऊन फोन पे क्रमांकावर पैसे पाठवण्यास सांगितले. जर पैसे दिले नाहीत, तर “बघून घेऊ” अशी धमकी दिली आणि उद्या पुन्हा याच वेळी येण्याची धमकी देऊन फिर्यादीकडून १२०० रुपये रोख खंडणी म्हणून घेतले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

सांगवीत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.प्रभू विनोद भोसले (२७, हडपसर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार आशिष बनकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभू हा ३० हजार रुपयांचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि १००० रुपयांची दोन जिवंत काडतुसे कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे जवळ बाळगताना आढळला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

चिखलीत जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक

पैशांवर जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (१ सप्टेंबर) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास चिखली येथील रामदासनगर येथे करण्यात आली.

प्रतीक हनुमंत थिटे (३४, चिखली), सतीश उत्तम ढेबरे (४१, चिखली), आशिष संजय मुंढे (३०, चिखली), संतोष राजाराम साने (४५, चिखली), सचिन मधुकर शेलार (४०, चिखली), आणि राजेश चंद्रकांत साने (४१, चिखली) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस नाईक सुरज सुतार यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदेशीरपणे पैशांवर तीन पत्ती जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून २ लाख १९ हजार रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.