पुणे : भारतातील बालमृत्यूंच्या प्रमाणात मागील पाच वर्षात लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. २०१४ मध्ये दर एक हजार बालकांमागे ४५ एवढे असलेले बालमृत्यू २०१९ पर्यंत दर एक हजार बालकांमागे ३५ पर्यंत कमी झाले आहेत. गर्भवती महिलांमधील रक्तक्षय (ॲनिमिया) नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेले उपचार, पुरवलेली औषधे, चांगल्या आहाराबाबत जनजागृती आणि बालकांच्या स्तनपानाबाबत आग्रह या कारणांमुळे बालमृत्यू कमी करण्यात यश येत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी ‘पालन’ या मोबाइल ॲपच्या उद्घाटनाच्या निमित्ताने याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत बाल आरोग्य कार्यक्रम आणि सर्वसमावेशक प्रयत्नांमुळेच बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणणे शक्य झाल्याचे या वेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. भारती पवार म्हणाल्या,की बालकांचे आरोग्य आणि आईचे आरोग्य या दोन परस्परावलंबी गोष्टी आहेत. पाच वर्षांखालील वयोगटातील मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी महत्त्वाच्या आरोग्य सेवा घरपोच मिळणे, प्रशासन स्तरावरील प्रयत्नांची मदत घेणे या गोष्टी जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांची याबाबतीत महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. दर्जेदार आहार, पोषक औषधांचा पुरवठा, स्तनपान, बालसंगोपन, बालकांचे जीवनावश्यक लसीकरण याबाबत मातांना साक्षर करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे बालमृत्यू घट कायम राखण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि तळागाळातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे डॉ. पवार यांनी या वेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले,की मुलांचे संगोपन हे केवळ आईनेच नाही तर कुटुंबातील प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. मुलांबरोबर आई-वडील आणि कुटुंबीय किती वेळ घालवतात,त्याला किती वेळा स्पर्श करतात, संवाद साधतात यावरदेखील मुलांचे कुटुंबीयांशी बंध निर्माण होतात. हे बंध त्यांना सुदृढ आरोग्य देण्यास महत्त्वाचे ठरतात असेही डॉ. व्यास यांनी स्पष्ट केले.