अलौकिक स्वरांनी अभिजात संगीतामध्ये आपली नाममुद्रा प्रस्थापित करणारे गायक अशी पं. जितेंद्र अभिषेकी यांची ओळख आहे. ‘माझे जीवनगाणे’, ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’, ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’, ‘काटा रूते कुणाला’ अशा गीतांमधून त्यांनी रसिकांना ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ या गीताची अनुभूती दिली आहे. त्यांची स्मृती जागविणाऱ्या पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवात १५ नोव्हेंबरपासून तीन दिवस रसिकांना गायन आणि वादनासह जुगलबंदीची मेजवानी अनुभवता येणार आहे.
गायन जुगलबंदी, संतूर-सतार आणि सरोद-सतार जुगलबंदी अशा नावीन्यपूर्ण मैफिलींनी सजलेला पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव १५ नोव्हेंबरपासून तीन दिवस यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे रंगणार आहे. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आपला परिसर आणि उज्ज्वल केसकर यांच्यातर्फे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून महापौर आणि नवनिर्वाचित आमदार मुक्ता टिळक या वेळी उपस्थित राहणार आहेत.
पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे यंदा १५ वे वर्ष आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करणारे महेश बाबू यांना पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार आणि युवा गायक सुरंजन खंडाळकर यांना पं. जितेंद्र अभिषेकी युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आर्या आंबेकर, मधुरा दातार, किशोर कुलकर्णी आणि चैतन्य कुलकर्णी यांचा सहभाग असलेली सुगम संगीत रजनी सादर होणार आहे, अशी माहिती तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त, प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी आणि उज्ज्वल केसकर यांनी शुक्रवारी दिली.
महोत्सवातील कार्यक्रम
शनिवार १६ नोव्हेंबर
(सकाळी ९ वाजता)
* विश्वजित मेस्त्री, अधिश्री पोटे, सुरंजन खंडाळकर (गायन)
(सायंकाळी ५.३० वाजता)
* अपूर्वा गोखले-पल्लवी जोशी (गायन जुगलबंदी)
* अभिषेक बोरकर-शाकीर खान (सरोद-सतार जुगलबंदी)
* रघुनंदन पणशीकर-आनंद भाटे (गायन जुगलबंदी)
रविवार १७ नोव्हेंबर (सकाळी ९ वाजता)
* नितीश पुरोहित (सरोद)
* आदित्य देशमुख (तबला)
* श्रुती वझे (गायन)
* संस्कृती-प्रकृती वहाणे (संतूर-सतार जुगलबंदी)
* अपर्णा केळकर (गायन)
(सायंकाळी ५.३० वाजता)
* मकरंद हिंगणे (गायन)
* पं. रोणू मुजुमदार (बासरीवादन)
* रामदास पळसुले (तबला)
* शेखर सेन आणि सहकाऱ्यांचा ‘कबीर’ हा संगीतमय प्रयोग
