पुणे : सिंहगड रस्ता परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमची जास्त रुग्ण आढळल्याने तेथे महापालिकेच्या पथकांनी अतिसार, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण केले होते. रुग्णसंख्या वाढीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने बुधवारी पुन्हा या रुग्णांचे तातडीने सर्वेक्षण करून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शहर परिसरात आढळून आलेल्या जीबीएस रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण सिंहगड रस्ता परिसरात आढळले आहेत. या परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचे सर्वेक्षण केले होते. त्यात अतिसार, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती घेण्यात आली होती. या सर्वेक्षणात अशी लक्षणे असलेले १४४ रुग्ण आढळून आले होते. केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने बुधवारी सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांची बैठक घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीत आरोग्य विभागाच्या पथकांना रुग्णांचे फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. याचबरोबर उच्चस्तरीय पथकाने सर्वेक्षणात नेमक्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, काय माहिती घ्यावी, कशा पद्धतीने सर्वेक्षणाची माहिती संकलित करावी, याची माहिती सर्वेक्षण पथकांना दिली. यात रुग्णांची लक्षणे आणि रुग्णांना नेमकी बाधा कशामुळे झाली, यावर उच्चस्तरीय पथकाने भर दिला, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

केंद्रीय उच्चस्तरीय पथकाची कार्यवाही

  • सिंहगड रस्ता परिसरातील जलस्त्रोतांची पाहणी
  • आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण पथकांसोबत बैठक
  • सर्वेक्षणाबाबत आरोग्य विभागाच्या पथकांना प्रशिक्षण
  • रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना
  • सर्वेक्षणाचे अहवाल दिवसअखेरीस सादर करण्याचे निर्देश