उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा कात्रीत अडकल्याने अनावश्यक कामांवरील खर्च टाळण्याचे वारंवार आदेश दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून उधळपट्टी सुरूच ठेवण्यात आली आहे. सिंहगड रस्ता येथील उड्डाणपुलाच्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोचे काम सुरू असल्याने दुभाजक काढले असतानाही या दोन्ही मार्गांवरील रस्ता दुभाजकांच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाखांची उधळपट्टी करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : रस्ते दुरवस्थेसंदर्भातील ठेकेदारांची सुनावणी पूर्ण

सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले असून रस्त्यावरील दुभाजक काढण्यात आले आहेत. सध्या खांब उभारणीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. फनटाइम चित्रपटगृहापासून राजाराम पुलापर्यंत हा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी दुभाजक काढण्यात आले असून दुभाजकांच्या जागेवर खांब उभारण्यात आलेले आहेत. सिंहगड रस्ता येथे दुभाजक सुशोभीकरणाची कामे करण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले आहे. या रस्त्याची रुंदीही कमी करण्यात आली आहे. या परिस्थितीत सुशोभीकरण कुठे करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा >>>पुण्यातील लुल्लानगरमधील हॉटेलला आग; घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या चार गाड्या दाखल

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून शिवाजीनगर-हिंजवडी या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. ही मेट्रो गणेशखिंड रस्ता, बाणेर रस्ता, बालेवाडी मार्गे हिंजवडीला जाणार आहे. मेट्रोच्या कामासाठी बाणेर रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेडिंग करून काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील दुभाजक काढून टाकले आहेत. मेट्रोच्या कामामुळे येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अशी स्थिती असतानाही पथ विभागाने दुरुस्तीऐवजी या दोन्ही रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी एकूण पन्नास लाखांच्या खर्चाची निविदा काढली असून त्याला मान्यताही देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>‘रुपी’ इतिहासजमा ; परवाना रद्द करण्यास स्थगितीची मागणी अर्थमंत्रालयाने फेटाळली

गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा कचाट्यात महापालिकेचा आर्थिक कारभार सापडला आहे. आर्थिक शिस्त नसल्याने जवळपास एक हजार पाचशे कोटींची अंदाजपत्रकीय तूटही महापालिकेला सोसावी लागत आहे. त्यामुळे अनावश्यक उधळपट्टी करण्यात येऊ नये, असे आदेश महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत. मात्र त्याकडे डोळेझाक करत उधळपट्टीची परंपरा अधिकाऱ्यांकडून कायम ठेवण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sinhagad road costing lakhs for bifurcation beautification at vidyapeeth chowk pune print news amy
First published on: 01-11-2022 at 10:33 IST