पुणे : दुचाकीचा धक्का लागल्याने भर रस्त्यात पिस्तुलातून हवेत गोळीबार करुन पसार झालेल्या सहा आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली. सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी ही घटना घडली होती.

साहिल अरविंद चव्हाण (वय २४), मंदार यशवंत चव्हाण (वय ३९), प्रशांत यशवंत चव्हाण (वय ३४, तिघे रा. सप्तगिरी हाईट्स, लमाणवाडी, खडकवासला), अभिजित राजू चव्हाण (वय ३१), आकाश भिमा चव्हाण (वय २४ ,दोघे रा. तिरुमल हाईट्स, काेल्हेवाडी, सिंहगड रस्ता), गितेश शंकर जाधव (वय २०, रा. नानाजी व्हिलामागे, खडकवासला) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात आरोपी चव्हाण, जाधव हे दुचाकीवरुन सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागातून निघाले होते. त्या वेळी एका दुचाकीला धक्का लागल्याने आरोपींनी दुचाकीस्वार तरुणाला धमकावून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी हवेत पिस्तूल उगारून तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी चव्हाण, जाधव हे पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन तीन पुंगळ्या जप्त केल्या होत्या.

पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. पसार झालेले आरोपी खडकवासला चौपाटीजवळ थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी स्वप्नील मगर, प्रतिक मोरे, संग्राम शिनगारे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपींना पकडले. आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, गुन्हे शाखेचे निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव, प्रवीण जाधव, उपनिरीक्षक कसबे, पोलीस कर्मचारी संग्राम शिनगारे, राजू वेगरे, प्रतिक मोरे, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भीमराज गांगुर्डे, उत्तम शिंदे, निलेश कुलथे, अक्षय जाधव, सतीश खोत यांनी ही कामगिरी केली.

शहरात किरकोळ वादातून तोडफोड, कोयते उगारून दहशत माजविणे, तसेच गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सेनापती बापट रस्त्यावर किरकोळ वादातून मोटारचालक तरुणाला भर चौकात बेदम मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली होती. हडपसर, धनकवडी भागात वाहनांची तोडफोड करण्याची घटना नुकतीच घडली होती.