गेली एकोणतीस वर्षे ‘पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन’ या नावाने आयोजित केल्या जात असलेल्या मॅरेथॉनचे नाव यंदा बदलण्यात आले नसले, तरी यंदा ही स्पर्धा ‘स्मार्ट सिटी मॅरेथॉन’ म्हणून ओळखली जावी यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत. स्पर्धेचे नाव बदलण्यात आले नसले तरी महापालिकेने ‘स्मार्ट सिटी अभियाना’त भाग घेतल्यामुळे यंदा विविध मार्गाचा अवलंब करून ही स्पर्धा ‘स्मार्ट सिटी मॅरेथॉन’ केली जाणार आहे.
महापालिकेतर्फे पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला दरवर्षी निधी दिला जातो. महापालिकेच्या अंदाजपत्रकातच तशी तरतूद करण्यात येते. यंदा या स्पर्धेसाठी महापालिका ५० लाख रुपये देणार आहे. स्पर्धेच्या प्रत्यक्ष आयोजनात दरवर्षी महापालिकेचा संबंध नसतो. मात्र यंदा ही स्पर्धा स्मार्ट सिटी मॅरेथॉन म्हणून ओळखली जाईल असे प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानातील पहिला टप्पा बाणेर, औंध येथून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच भागातून मॅरेथॉन जाणार आहे, असेही सांगितले जात आहे. मॅरेथॉन मार्गावर अनेक ऐतिहासिक स्थळे, महत्त्वाच्या संस्था असून परदेशी खेळाडूंपासून ते देशभरातील प्रेक्षकांना दूरदर्शनच्या माध्यमातून ही स्थळे व संस्था दिसणार आहेत. त्यातून पुण्याची ओळख होणार आहे, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
या स्पर्धेच्या संकेतस्थळावर, ओळखपत्रावर, विविध फलकांवर, सहभागाच्या तसेच गुणवत्ता प्रशस्तिपत्रकांवर, व्यासपीठावर, प्रारंभ तसेच अंतिम रेषेवर, गौरवचिन्हावर, विजेत्यांच्या पदकांवर, करंडकावर ‘स्मार्ट सिटी आय सपोर्ट पुणे मॅरेथॉन’ हे बोधचिन्ह लावण्यात येणार आहे. क्रीडाक्षेत्राच्या माध्यमातून स्मार्ट सिटी पुणे सादर करण्याचा असा हा पहिलाच मोठा व भव्य प्रकल्प आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
‘स्मार्ट सिटी मॅरेथॉन’ या नावाने यंदाची स्पर्धा ओळखली जावी असे प्रयत्न केले जाणार असले, तरी महापालिकेतील कोणत्याही अधिकृत समितीची मान्यता न घेता परस्पर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कोणालाही विश्वासात घेण्यात आलेले नाही, असे पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. स्मार्ट सिटी अभियानासाठी अनेक गोष्टींचा अतिरेक सुरू असून नित्य कामकाजाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, अशी परिस्थिती आहे. स्मार्ट सिटी अभियानामुळे इतर सर्व छोटी-मोठी कामे खोळंबली आहेत, अशाही अनेक तक्रारी आहेत.